नाशिक - कोरोना विषाणूने संपूर्ण देशात थैमान घातले असून त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या हात मजूर तसेच गोरगरीबांवर उपासमारीची वेळ आली असल्याने जगणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थिती येवला येथे मनमाड उपविभागतील टपाल निरीक्षक राजेंद्र वानखेडे यांच्यासह सर्व टपाल कर्मचारी धावून आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेकजणांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कित्येकांचा रोजगार बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. शासन या गरजूंपर्यंत मदत पोहचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. यातच अशा कठीण परिस्थितीत टपाल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने गोरगरीब, गरजूंसाठी येवला तालुक्यातील कोटमगाव येथील आदिवासी वस्ती पाड्यावर जाऊन अन्नधान्य व किराणा सामान वाटप करण्यात आले. येवला टपाल विभागाद्वारे करण्यात आलेली मदत ही गरजूंसाठी आशेचा किरण ठरली आहे.