नाशिक - नाशिकच्या सिडको भागात राहणाऱ्या एका चार वर्षच्या मुलीवर एका चोरट्याने तिच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीच्या उद्देशाने धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत मुलीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. चोरीसाठी चोरटे आता मुलांना लक्ष्य करत असल्याने पालक चिंता व्यक्त करत आहे.
नाशिक शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. मात्र आता या चोरट्यानी लहान मुलांना लक्ष केले आहे. अशीच एक घटना शहरातील सिडको भागात घडली. या भागातील हनुमान चौक भागात अवनी पगारे ही मुलगी खेळत असताना एक अज्ञात व्यक्तीने मुलीला आपल्या जवळ बोलावून तिच्या गळ्यातील सोन्याची हिसकवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने त्याला विरोध केल्याने त्याने थेट मुलीच्या हातावर धारधार शस्त्राने वार करत पळ काढला. मात्र या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरलं आहे. अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहे.
गुन्ह्याचा घटनात वाढ -
नाशिक शहरात मागील 20 दिवसात वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी 24 लाखांचा ऐवज लांबवला आहे. तसेच खून, हाणामाऱ्या आदी घटना देखील वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. ज्या पध्दतीने पोलिसांनी हेल्मेटसक्ती बाबत पुढाकार घेतला त्या पद्धतीने बरोबर सराईत गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहे.