नाशिक - राज्यात कोरोनाचा हाहाकार असताना मुख्यमंत्र्यांनी मैदानात असले पाहिजे, मात्र त्यांना त्याचे गांभीर्य नसल्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले. गिरीश महाजन यांनी काल नाशिकला भेट देऊन शहरातील वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला. शहरात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल होत असून याबाबत आमचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे महाजन यांनी पत्रकार परिषदेत सागितले.
हेही वाचा - नाशिक रोड रेल्वे पोलीस वृद्ध प्रवाशासाठी ठरले देवदूत, थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
लोकसंख्येच्या तुलनेत देशात नाशिकमध्ये कोरोनाबधितांचा आकडा सर्वाधिक असून रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नाही. रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू होत असल्याचे महाजन म्हणाले. काल महाजन यांनी नाशिकच्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांत जाऊन वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला असता त्यांनी राज्य सरकार प्रति नाराजी व्यक्त केली. तसेच, भाजपची सत्ता असलेली महानगरपालिके रुग्णांना चांगल्या प्रकारे वैद्यकीय सुविधा देत असल्याचे त्यांनी म्हटले.
राज्यात कोरोनाचा हाहाकार असताना मुख्यमंत्र्यांनी मैदानात असले पाहिजे, मात्र त्यांना त्याचे गांभीर्य नसल्याचे म्हणत, त्यांना विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करावी, असेही वाटत नाही. केंद्र सरकारकडून लस उपलब्ध करून देण्यात आली. रेमडेसिवीर खरेदीचे अधिकार राज्य सरकारला दिले असताना नियोजन होत नाही. रेमडेसिवीरसाठी आता ग्लोबल टेंडर काढणार, पण कधी? असे म्हणत, हे सरकार भरकटले असल्याचेही गिरीश महाजन म्हणाले.
तर खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाई झाली पाहिजे
खासगी रुग्णालयांच्या बिलाच्या अनेक तक्रारी आहेत. रेमडेसिवीर औषध 15 ते 20 हजारांना विकले जात आहे. काही रुग्णालये माणूसकी शुन्य वागत आहे. अवास्तव बिलांसाठी रुग्णांना डांबून ठेवले. वोकार्ड रुग्णालयामधील प्रकार घृणास्पद असून काळाबाजार करणाऱ्या आणि लूट करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असेही गिरीश महाजन म्हणाले.
खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडले
एकनाथ खडसे आणि एका मुलाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. मुलाने पाणी नाही आहे, असे सांगायला फोन केला होता. या शाळकरी मुलासोबत बोलताना खडसे यांनी माझ्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. शाळकरी मुलासोबत बोलताना खडसे यांची जीभ घसरली असून, वैफल्यग्रस्त झालेल्या खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे गिरीश महाजन म्हणाले. एकेकाळी मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले खडसे यांचा फारच तोल जात असून त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज असल्याचा टोला महाजन यांनी लगावला.
हेही वाचा - नाशिकमध्ये महापौरांचे ऑक्सिजन, रेमडेसिवीर पुरवठ्याबाबत जिल्हाधिकार्यांना साकडे