नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे यावर्षी महापालिका प्रशासनाच्या वतीने घरोघरी जाऊन गणेशमूर्ती संकलन करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. कोरोनाचे संकट असल्याने सार्वजनिक गणेश मंडळांना आणि नागरिकांना अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे, तर मूर्ती संकलनात मदत व्हावी म्हणून मनपाच्या वतीने अॅपही लाँच करण्यात येणार आहे.
दरवर्षी राज्यभरासह नाशिक जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. यावर्षी सार्वजनिक गणेश मंडळांनी फक्त 4 फुटांपर्यंत असलेल्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच यावर्षी गणेश मिरवणुकीवरही बंदी घालण्यात आली आहे.
हेही वाचा - राज्यात 11 हजार 88 नवे कोरोनाबाधित; 10 हजारांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज
तर दुसरीकडे घरगुती गणपती विसर्जनासाठी लोकांची गर्दी होऊ नये, म्हणून मनपाकडून उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यंदा लोकांच्या घरी जाऊन गणपती संकलन करून विसर्जन करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.
यासाठी मनपा एका सामाजिक संघटनेच्या मदतीने एक मोबाईल अॅप विकसित करणार आहे. या अॅपवर नागरिकांनी आपली नोंदणी करुन मनपाला मूर्ती संकलनात मदत करावी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त गमे यांनी केले आहे.
दरम्यान, या नोंदणीनुसार महापालिकेचे कर्मचारी नागरिकांच्या घरी जाऊन गणपती संकलन करून विसर्जन करणार आहेत. तसेच जे नागरिक स्वतः गणपती विसर्जन करणार आहेत त्यांच्यासाठी यावर्षी मनपाच्या वतीने मोठ्या कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात येणार आहे.