नाशिक - जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यातील उर्वरित केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात, मोफत धान्य मिळावे, अशी मागणी बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.
बागलाण तालुक्यातील बहुतांश तरुण हे रोजगारासाठी नाशिक, पुणे, मुंबई या शहरात वास्तव्यास होते. कोरोनामुळे रोजगार गेल्याने ही कुटुंबे गावी परतली असून हाताला काम मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. बागलाण हा आदिवासी बहुल तालुका आहे. तालुक्यात आज १३ हजार ४४४ अंत्योदय व २ लाख ९ हजार ६२० प्राधान्य कुटुंब लाभार्थी धान्याचा लाभ घेत आहेत. उर्वरित नागरिक या योजनेपासून वंचित आहेत. रोजगार नाही त्यात या शासकीय योजनेचा लाभही त्यांना मिळत नसल्यामुळे नागरिकांकडून शासनाच्या अन्न धान्य योजनेचा लाभ मिळण्याची मागणी होत आहे. बागलाण तालुक्यातील उर्वरित वंचित कुटुंबांची उपासमार थांबवण्यासाठी त्यांना शासनाकडून अन्न धान्य मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे बागलाण तालुक्यातील शहरी व ग्रामीण भाग मिळून १ हजार ४२० अंत्योदय शिधापत्रिकेस व ११ हजार ५०० प्राधान्य कुटुंब लाभार्थी संख्या वाढवून मिळावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.