नाशिक - दिंडोरी तालुक्यातील वाघाड प्रकल्प आशिया खंडातील शेतकऱ्यांचा पहिला पाणी वापर प्रकल्प आहे. या जलक्षेत्राच्या सुधारसाठी लागणार्या आवश्यक निधीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिंडोरी लोकसभेच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी दिले. वाघाड पाणी वापर प्रकल्प जल पूजनाच्या प्रसंगी त्या अध्यक्षीय भाषणात बोलत होत्या.
हेही वाचा - नाशिक, मुलांच्या बुद्धी संवर्धन कोड्यांच्या प्रदर्शनाला उस्फुर्त प्रतिसाद
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धन, उपविभागीय अभियंता हर्षद देवरे, शाखाधिकारी नरोटे, शुभम भालके, समाज परिवर्तन केंद्र प्रतिनिधी लक्ष्मीकांत वाघवकर, लता कावळे, अवनखेड चे सरपंच नरेंद्र जाधव, अर्चना पुरकर, वनिता पवार, वाघाड प्रकल्पाचे अध्यक्ष तुषार वसाळ, रामनाथ वाबळे, पुंजा शिंदे, मधुकर पवार, रमेश पाटील, प्रभाकर विधाते, शिवाजी पिंगळ आदी उपस्थित होते.
कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धन यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी, शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांचा चालवलेल्या प्रकल्प भारताबरोबर इतर देशात देखील प्रेरणादायी ठरत आहे. उत्कृष्ट पाणी नियोजन व संस्थेचा राजकारण विरहित स्वच्छ कारभार ही जमेची बाजू आहे. नरेंद्र जाधव यांनी सांगितले की, दिंडोरी हा धरणांचा तालुका असून एप्रिल व मेमध्ये येथे दुष्काळाचा मोठा सामना करावा लागतो. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राखीव पाणी कोठा निश्चित करण्याची तरतुद करणे गरजेचे आहे.
प्रास्ताविक चंद्रकांत राजे, सूत्रसंचालन वाघाड प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष शहाजी सोमवंशी यांनी तर आभार संस्थेचे सचिव बाळासाहेब कदम यांनी मानले. यावेळी वाघाड प्रकल्पावरील सर्व पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी, सभासद, शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.