नाशिक - दिंडोरी तालुक्यात प्रामुख्याने नगदी पीक म्हणून द्राक्षाचे उत्पादन काढण्यात येते. मात्र यंदा अवकाळी पाऊस, धुकं, अचानक वाढलेली थंडी यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी निराश झाला आहे.
पावसामुळे घडकुज, मिलीबग, डावणी, भुरी यासारख्या रोगाचा प्रार्दुभाव होण्याची भीती शेतकरी वर्तवत आहे. तसेच रब्बीचा हंगाम सूुरू झाल्यानंतर पाऊस चांगला होता. वातावरण चांगले होते. मात्र पुन्हा वातावरण बदलले. निसर्गाचा असाच लहरीपणा सुरू राहिल्यास यंदा कोणतेही पीक हातात येणार नसल्याचे शेतकरी संतोष रेहेरे यांनी सांगितले.
नाशिक जिल्हा द्राक्ष आणि कांद्याच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. देशात सर्वाधिक द्राक्षाचे उत्पादन दिंडोरी तालुक्यात घेतले जाते. अनेक देशात येथील द्राक्ष निर्यात होत असतात. मात्र, मागील चार दिवसांपासून तापमानाचा पारा घसरत चालल्याने द्राक्ष उत्पादक धास्तावला आहे. जास्त थंडीमुळे निर्यातक्षम द्राक्षाची फुगवण मिळणे अवघड होते. तसेच अति थंडीमुळे औषध फवारणीचा खर्च देखील दुप्पट होतो. यासोबतच धुके आणि ढगाळ वातावरणामुळे हरभरा, गहू, मका आणि भाजीपाला या पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे.
दिंडोरी तालुका झाला काश्मीर
आज सकाळी संपूर्ण दिंडोरी तालुका धुक्यात हरवला होता. संपूर्ण दिंडोरी, वणी शहरावर धुक्याची पांढरी चादर पसरली होती. या धुक्यामुळे आणि थंडीमुळे पाणी उतरलेल्या द्राक्षांच्या माण्यांना तडे जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दिंडोरी तालुक्याच्या हद्दीवर सप्तश्रृंगी देवीचा डोंगरावर सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. रस्ते देखील धुकेमय झाल्यामुळे वाहन चालवताना चालकांना अडचणी येत आहेत.