नाशिक - शनिवार रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील उंटवाडी परिसरात कमरेपर्यंत पाणी साचून पुराचे स्वरुप आले आहे.
नाशकात शनिवार रात्रीपासुन मुसळधार पडत असल्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यासोबतच नाशिकच्या धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहेत, ह्यामुळे महापूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोबतच मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे नाशिककरांचे जनजीवन विस्कळीत झाले असून नाशिकचे प्रमुख रस्तेही जलमय झाल्याने अनेक ठिकाणी वाहतुक ठप्प झाली आहे.
नाशिकच्या उंटवाडी परिसरात कमरेपर्यंत पाणी साचल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. ह्या ठिकाणी असलेली नंदिनी नदी ओसंडून वाहत आहे त्यामुळे सर्व पाणी रस्त्यावर आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. येथील नाशिक-सिडको आणि सातपूर ह्या प्रमुख परिसरांना जोडणारा रस्ता पाण्यामुळे बंद झाला आहे.
नाशिक शहरातील अनेक रस्ते जलमय झाले असून नाशिक महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी करावयाचे ड्रेनेज साफसफाईचे काम व्यवस्थित नसल्यामुळे अनेक भागात ड्रेनेजमधून देखील मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर येत असून शहरातील अनेक परिसरांना पाण्याने सर्वत्र व्यापले आहे.