नाशिक Nashik Accident News : मनमाडमधून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर अनकवाडे शिवारात रेल्वे ओव्हरब्रिजवर स्विफ्ट कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. यात दोन सख्ख्या भावासह पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय. हे पाचही जण नाशिक येथील रहिवासी असून, मनमाडनजीक असलेल्या कुंदलगाव येथे मित्राच्या कार्यक्रमासाठी आलेल्या या पाचही मित्रावर काळाने घाला घातला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, स्थानिकांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरा त्यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
पाच मित्रांचा जागीच मृत्यू : अनकवाडे शिवारात रेल्वे ओव्हरब्रिजवर स्विफ्ट कार (क्रमांक एम एच 06 ए एन 8890) कंटेनरची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, स्विफ्ट कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय. यात गणेश शरद सोनवणे, ललित शरद सोनवणे (रा. पेठ रोड नाशिक) या दोन सख्ख्या भावासह श्रेयस धनवटे, रोहित धनवटे (रा. पंडित कॉलनी, नाशिक) आणि प्रतीक नाईक या पाच मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. मनमाड शहर पोलिस घटनास्थळी दाखल होऊन, त्या सर्वांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासणी करून सर्वांना मृत घोषित केले.
दादा भुसेंची घटनास्थळी भेट : हे पाचही जण मनमाडनजीक असलेल्या कुंदलगाव येथे धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम आटोपल्यावर येवला मार्गे जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून दिलासा देत सांत्वन केलं.
पालकमंत्र्यांनी केले सांत्वन : मनमाडला अपघात झाल्याची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे यांनी तत्काळ उपजिल्हा रुग्णालय येथे भेट देऊन डॉक्टरांशी चर्चा केली. मृत झालेल्या तरुणांच्या नातेवाईकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांना दिलासा देऊन सर्वोतोपरी मदत केली जाईल, असं आश्वासन दिलं. मालेगाव मनमाड रस्त्यावर झालेला अपघातामुळं वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना सूचना दिल्या होत्या.
हेही वाचा -