येवला (नाशिक)- येवल्यातील अंकाई बारीजवळ मनमाड येथील सराफ व्यवसायिकास चाकूचा धाक दाखवून सोने चांदीचे दागिने लुटल्याची घटना शुक्रवारी घडली होती. त्यानंतर २४ तासात ५ चोरट्यांना जेरबंद करण्यात येवला पोलिसांना य़श आले आहे. संतोष बाविस्कर असे त्या लूट झालेल्या सराफा व्यावसायिकाचे नाव आहे.
सराफा व्यावसायिक बाविस्कर हे शुक्रवारी तालुक्यातील कातरणी-विसापूर तसेच विखरणी या भागातल्या ग्राहकांनी मागणी केलेले सोने-चांदीचे दागिने पोहोच करण्यासाठी आणि नवीन दागिन्यांची ऑर्डर घेण्यासाठी दुचाकी वरून गेले होते. दिवसभराचे खरेदी विक्रीचे काम आटपून ते विसापूर रोडने मनमाडकडे जात होते. त्यावेळी अंकाई बारीजवळील खडी क्रेशरजवळ आले असता, पाठीमागून मोटार सायकलवर तीन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी बाविस्कर यांची दुचाकी थांबवली आणि चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडून सोन्या,चांदीचे दागिने लूटले. चोरट्यांनी एकूण १ लाख ३० हजार रुपयांची मुद्देमाल लुटला होता.
या घटनेनंतर बाविस्कर यांनी तत्काळ येवला तालुका पोलीस स्टेशन गाठले आणि झालेल्या लुटीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील जलदगतीने पुढील तपास सुरू केला. त्यानंतर घटनेनंतर 24 तासातच आरोपीचा शोध लावण्यास पोलिसांना यश आले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत वेगवेगळ्या ठिकाणाहून 5 चोरट्यांना अटक केली आहे. त्यानंतर चोरट्यांनीही बाविस्कर यांना लुटल्याची कबुली दिली आहे.