नाशिक - जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या नऊ कोरोना संशयितांपैकी एका संशयिताचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत. त्यामुळे गेली अनेक दिवस 'नो कोरोना सिटी' म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये कोणाचा शिरकाव झाला आहे. नाशिकच्या लासलगाव निफाड तालुक्यातील 30 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालात समोर आले आहे. विशेष म्हणजे या पॉझिटिव्ह रुग्णाचा कोणत्याही प्रकारचा प्रवासाचा इतिहास नसतानादेखील हा युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक जिल्हा प्रशासन नाशिकमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, जिल्ह्यात पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या युवकाला कोरोनाची लागण झाली, तो युवक नाशिकच्या ग्रामीण भागातला आहे आणि तो इतर कोणत्याही देशातून आलेला नाही किंवा कुठल्या राज्यातूनही आलेला नाही. त्यामुळे या युवकाला लागण कशी झाली? याचा शोध जिल्हा प्रशासन घेत आहे.
कोरोनाबाधित युवकाची प्रवास इतिहास नसताना त्याला कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनासमोर या युवकाला कोरोनाची लागण कशी झाली, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे आता नागरिकांनी प्रशासनाला पुढील काळात अधिक सहकार्य करणे गरजेचे आहे.