दिंडोरी (नाशिक) - दिंडोरी तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. तालुक्यातील इंदोरे गावामधील एका 46 वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे तालुका प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. तालुक्यातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल असलेले झारली पाडा येथील 6 पैकी 5 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून एकाचा अहवाल येणे बाकी आहे.
दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावांतील गावापासून जवळच असलेल्या वस्तीवरील 46 वर्षीय पुरुष जो मुंबई येथे नोकरीस आहे. तो 26 एप्रिल रोजी मुंबई येथून एका भाजीपाला वाहतूक करणाऱ्या गाडीमधून गावांकडे आला होता. गावापासून वस्ती दुरवर असल्याने संबंधित व्यक्ती मुंबईवरुन आल्याची कुणकुण चार दिवसानंतर लागली. त्यानंतर प्रशासनाला माहिती मिळाल्यावर त्याची आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी करून त्यास 2 मे रोजी नाशिकच्या रुग्णालयात दाखल केले होते. संबंधित रुग्णाचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील यंत्रणा पुन्हा कामाला लागली आहे. आज प्रशासनाच्या वतीने इंदोरे व तळेगांव दिंडोरी शिवारातील त्या रुगांच्या वस्तीपासूनचा दोन किलोमीटरचा भाग प्रतिबंधीत केला असून परिसरात आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी केली जात आहे.
त्या व्यक्तीच्या कुटुंबातील लहान-मोठे असे एकूण 12 व शेजारचे दोनजण तसेच ज्या गाडीतून तो आला होता त्या गाडीचा चालक असे एकूण 15 जणांना कोव्हिड विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्या सर्वांची तपासणी करुन स्वॅब परीक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे. तसेच चार दिवसात ती व्यक्ती परिसरातील कोणत्या गावात, कोणाकडे गेली होती याचाही शोध सुरू आहे.
संबंधित रुग्ण व त्याचे कुटुंबिय व परिसरातील नागरिकांना उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाचे सर्व पथक विशेष परिश्रम घेत आहेत. याबाबत तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहत आपली काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांनी केले आहे.
हेही वाचा - नाशकात वेतन कपातीच्या कारणावरून पालिका कर्मचाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी