नाशिक - नाशिकमध्ये आदिवासी विकास विभागाच्या भरती प्रक्रियेत घोटाळा झाला आहे. जुलै २०१४ ते एप्रिल २०१६ या काळात राबवण्यात आलेल्या भरतीय प्रक्रियेत घोळ झाल्याचे समोर आले. आदिवासी विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५८४ पदांसाठी झालेल्या नोकरभरतीमध्ये ३०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे.
- २०१४ ते २०१६ या काळात राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत घोळ -
राज्याच्या आदिवासी विकास महामंडळ व शबरी महामंडळातील नोकर भरतीत झालेल्या घोटाळा प्रकरणी आदिवासी विभागाच्या २ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भरती प्रक्रिया राबविणाऱ्या कंपनी मालकाविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१४ ते २०१६ दरम्यान राज्याच्या आदिवासी विभागातील या दोन महामंडळांमध्ये ५८४ पदांसाठी झालेल्या नोकर भरतीमध्ये ३०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
- मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल -
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने याप्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. अखेर आज या नोकरभरती घोटाळा प्रकरणी आदिवासी विभागातील तत्कालीन महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे, तत्कालीन अप्पर आयुक्त अशोक लोखंडे आणि ज्या संस्थेच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवली गेली, त्या कुणाल आय.टी सर्व्हिस कंपनीचे संचालक संतोष कोल्हे यांच्या विरोधात नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.