नाशिक - नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आठ दिवसांपूर्वी काकडी, शिमला आदी शेतमालाला कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना हा शेतमाल फेकून देण्याची वेळ आली होती. बुधवारी देखील टोमॅटोला कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना हा माल बाजार समिती आवारात फेकून द्यावा लागला.
वाहतूक खर्चही निघेना -
टोमॅटोला कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना टोमॅटोचा माल बाजार समिती आवारात फेकून द्यावा लागला. वाहतूक खर्चही निघत नसल्याने हा माल पुन्हा घरी नेऊन करायचा काय, असा सवाल उपस्थित करीत शेतकऱ्यांनी मार्केट कमिटीच्या आवारात कॅरेट मधील टोमॅटो टाकत प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
व्यापाऱ्यांचा माल घेण्यास नकार -
पेठरोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड आवारात नाशिकसह निफाड, सिन्नर आदी भागांतून टोमॅटो आवक होते. बुधवारी जवळपास ४७ हजार ३०० जाळ्यांची आवक झाली. प्रतवारीनुसार एका जाळीला अवघे ५० ते १८० रुपये बाजारभाव मिळाला. रात्री उशिरा टोमॅटोची आवक आणखी वाढल्याने सुमारे दहा ते बारा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोचा माल मार्केट यार्ड आवारात व प्रवेशद्वारावर टाकून संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, या संदर्भात बाजार समिती प्रशासनास विचारणा केली असता संबंधित टोमॅटो हा बदला माल म्हणजेच किडीचा माल असल्याने व्यापारी वर्गाने घेतला नाही, असे सांगितले आहे.