सोलापूर - काळ्या मातीत घाम ओतून देखील कष्टाची चीज होत नाही. म्हणून शेतकरी बाप निराश होतो. मात्र माढ्यातील एका शेतकऱ्याच्या मुलाने स्वत:च्या स्वप्नाची माती होऊ दिली नाही. माय-बापाच्या काबाडकष्टाशी इमान राखत मेहनत करून या शेतकरी पोरानं आयआयटी परीक्षेत भरारी मारली आणि तुषार कदम आयआयटी अभियंता झाला. मुलाच्या या नेत्रदिपक कामगिरीमुळे आई-वडिलांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.
पहिल्याच प्रयत्नात यश
माढ्यातील तुषार विलास कदम याने आयआयटी परीक्षेत उत्तीर्ण होत यशोशिखर गाठले आहे. शेतकरी कुटूंबातील तुषारने पहिल्याच प्रयत्नात मिळवलेल्या यशाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे. वडिल विलास आणि आई लता कदम हे दोघेही शेतात शेती करून कुटूंबाचा गाडा हाकतात. तुषारचे प्राथमिक शिक्षण माढ्यातील जिल्हा परिषद शाळेत झाले. तुषारच्या शिक्षणासाठी त्यांनी मेहनत घेऊन ऊसनवारी करून शिक्षण पुर्ण केले. त्याचे फलित त्यांना आज मिळाले आहे. हे सांगताना आई-वडीलांच्या डोळ्यातील आनंदाश्रुंनी मोकळी वाट करुन दिली.
अभियंता होण्याचे स्वप्न
भारतीय प्रौद्योगिकी संस्थान इंदौर (आयआयटी) येथे तुषार शिक्षण घेत होता. अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून त्याने ८६ टक्के गुण पटकाविले आहे. तुषारला परदेशी कंपनीतुन चांगल्या पॅकेजची ऑफर देखील आली आहे. मात्र तुषारने त्यास नाकारले आहे. एम.बी.ए.चे शिक्षण पुर्ण केल्यानंतर अभियंता म्हणून कार्यरत होणार असल्याचे तुषार म्हणतो. सध्या तो भारतीय प्रौद्योगिकी संस्थान रुडकी (उत्तराखंड) येथे एम.बी.ए चे शिक्षण घेत आहे.
स्वत:शी स्पर्धा करा
कोणत्याही स्पर्धेत यश मिळाले तर हुरळुन जाता कामा नये अन् अपयशाने खचून जाऊ नये. आपण अपयश पचवण्याची ताकद निर्माण करायला हवी. आपल्या मित्रांना स्पर्धक न मानता अभ्यासात सातत्य ठेवत स्वत: बरोबर स्वत:ची स्पर्धा करा, म्हणजे आपल्यातील क्षमता जागी होईल. शिवाय आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवावी, असा सल्ला तुषारने यानिमित्ताने दिला.