नाशिक - कांद्याला चांगले दर मिळत असतानाच कर्नाटक, राजस्थान,आंध्रप्रदेश व गुजरातमधून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील बाजारपेठेत कांदा दाखल झाला आहे. आवक वाढल्यामुळे दोनच दिवसात कांद्याच्या दरात सुमारे एक हजार ते पंधराशे रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सहा हजार रुपये प्रती क्वीटलपर्यंत पोहचलेला कांदा चार हजार रुपयांपर्यंत येऊन ठेपला आहे. परिणामी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने कांदा निर्यात पुन्हा खुली केल्यास नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्याला थोडा दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या शेतकऱ्यांची आणखी दयनीय अवस्था होत आहे. त्यामुळे केंद्र सरकार कांदा निर्यात खुली करणार का, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. 4 नोव्हेंबरला जिल्ह्यात कांद्याचे दर सहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र प्रमाणात आवक वाढल्याने झाल्याने हे दर दोन दिवसात घसरले. बुधवारी कांदा सरासरी 4400 रुपयांनी विक्री झाला होता.
हेही वाचा - पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे 6 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा, मुख्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
परतीच्या पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असतानाही थोड्याफार प्रमाणात हाती लागलेला लाल कांदा बाजारपेठेत आणण्याचा प्रयत्न नाशकातील शेतकरी करत आहेत. मात्र चार राज्यातून कांद्याची आवक सुरू झाल्याने भावात घसरण सुरू झाली. कांदा भाव स्थिर राहावे व शहरांमध्ये कांद्याच्या दराबाबत ओरड होऊ नये, या उद्देशाने काही दिवसांपूर्वी निर्यात बंदी करण्यात आली होती. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी केंद्राने निर्यात पुन्हा खुली करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
इतर राज्यांतून झालेली कांद्याची आवक
कर्नाटक
बेळगाव - 80 हजार क्विंटल
बेंगलोर - 60 हजार क्विंटल
राजस्थान
अलवर - 25 हजार क्विंटल
आंध्र प्रदेश
कर्नुल -7 हजार क्विंटल
गुजरात
गोंडल -5 हजार क्विंटल