दिंडोरी - पहिल्या दोन तासात सकाळी ९ वाजेपर्यंत दिंडोरी मतदारसंघात ७.२८ टक्के मतदान झाले. ग्रामिण भागातून मतदानासाठी निरुत्साह दिसून येत आहे. शेतकरी वर्गाचे प्रश्न सुटले नाहीत असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे मतदान करण्यासाठीच शेतकरी निरुत्साही असल्याचे दिसून येत आहे.
दिंडोरी मतदार संघ हा आदिवासीबहुल मतदारसंघ असून भाजपा किंवा काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांच्या संबंधी कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. शेतकऱ्यांच्या बाजुने कोणतेही धोरण आखले नसल्याने शेतकरी वर्ग हा मतदानासाठी येताना दिसून येत नाही. दिंडोरी मतदार संघात भाजपाच्या भारती पवार, काँग्रेस -राष्ट्रवादीचे धनराज महाले आणि माकपचे जे.पी. गावित अशी तिरंगी लढत होत आहे. कमी होणाऱ्या मतदानामुळे दिंडोरी मतदारसंघातील लढत चुरशीची होणार असे सांगितले जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून दिंडोरी मतदार संघात ५५ ते ६० टक्के मतदान होत आहे. ह्या वर्षी ही आकडेवारी तशीच राहण्याची शक्यता आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले आहेत. सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी काहीही केले नाही. असे म्हणत शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.