नाशिक - दिंडोरी तालुक्यात पांडव पंचमीला मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड केली जाते. मात्र, यावर्षी लागवडीच्या वेळीच बेमोसमी पावसामुळे टोमॅटोची रोपे खराब झाली. दुबार लागवडीची जोखीम घेऊन शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पीक घेतले. असे असताना, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वणी कसबे उपबाजार समितीत टोमॅटोचे भाव कोसळल्याने बळीराजा नाराज झाला आहे.
लागवड केलेल्या टोमॅटोचेही सततच्या पावसामुळे नुकसान झाले. त्यातून शक्य होईल तितके पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना अतोनात मेहनत करावी लागली. आक्टोबरच्या शेवटच्या आठवडयात टोमॅटोला 700ते 800 रुपये प्रति कॅरेट (20 कीलो) भाव मिळाला होता. मात्र, नोव्हेंबरच्या पहील्या पंधरवाडयात केवळ १०० ते ३०० रुपये भाव मिळाल्याने लागवडीचा खर्चही निघत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
हेही वाचा - नाशकात कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाच्या धाडी
गेले दोन दिवस झाले टोमॅटो लाल होण्यासाठी पोषक असे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आहे तो मालही पिकून खराब होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांनी कमीत कमी 300 रूपये भाव देऊन टोमॅटो खरेदी करावे, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.