नाशिक - पारंपरीक शेती पिकांना फाटा देत आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शेतात वेगळा प्रयोग करून उपवासाला लागणारे रताळ्याचे पीक घेतले आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातील पगार कुटुंबीयांनी सुमारे ५० गुंठे जागेत दोनशे क्विंटल रताळी काढत उच्चांकी उत्पादन पीक घेतले आहे.
कुठल्याही औषधाची फवारणी न करता रताळी पिकविली
कोरोनाच्या काळात शेती उत्पादनावर खूपच परिणाम झाला. त्यातही फळ-भाज्या उत्पादनावर कधी चांगला भाव मिळाला, तर कधी भाजीपाल्याला भावच मिळाला नाही. आषाढी एकादशीच्या निमित्ताने उपवासाला रताळ्यांची जास्त मागणी असते. त्या पार्श्वभूमीव नाशिकच्या देवळा तालुक्यातील पगार कुटुंबीयांनी पारंपरिक पिकाला फाटा देत रताळ्याची शेती केली आहे. यामध्ये सुमारे ५० गुंठे जागेत रताळ्याची लागवड केली. यामध्ये तब्बल २०० क्विंटल रताळ्याचे उत्पादन यामध्ये घेतले आहे. विशेष म्हणजे रासायनिक खते व कुठल्याही औषधाचा यामध्ये वापर केलेला नाही. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर रताळ्याला चांगली मागणी असल्याने, व्यापारी थेट बांधावर खरेदी करण्यासाठी येत आहेत. ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. तरी, चार ते पाच लाखांचे उत्पन्न शेतकऱ्यांला अपेक्षित आहे.
'घरगुती पद्धतीने गावठी बियाणे तयार करत अशी केली रताळ्यांची लागवड'
घरगुती पद्धतीने गावठी बियाणे तयार करत पगार कुटुंबीयांनी रताळ्याची लागवड केली आहे. बागायती व हलक्या प्रतीच्या जमिनीत शेणखत वापरत व मुबलक पाणी दिले. रताळ्याच्या वेली एकमेकांना चिकटू नयेत म्हणून चाळणीवर लक्ष केंद्रित केले. यातून रताळी पोसत गेली. मागील तीन दिवसांपासून ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करून रताळ्यांची काढणी देखील सुरू आहे. रताळ्याच्या या पीक काढणीपर्यंत केवळ ४० हजार रुपये खर्च आला असून, बाजारपेठेत या पिकाला मागणी असल्याने निश्चितच हे पीक पगार कुटुंबीयांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे.