येवला (नाशिक) - जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंदरसुल गावातील शेतकऱ्याने राज्य शासनाकडून मिळालेला मदतीचा धनादेश परत केला आहे. साडेएकवीस लाखांचे नुकसान झाले असता फक्त पाच हजार रुपयांचा धनादेश दिला होता. त्यामुळे शेतकऱ्याने तो धनादेश परत केला आहे.
अंदरसुल येथील गजानन देशमुख यांच्या अनेक कोंबड्या 3 जूनला आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने मृत्युमुखी पडल्या होत्या. संपूर्ण पोल्ट्रीचे शेड जमीनदोस्त झाले होते. या घटनेची पाहणी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्वतःहून केली. त्यानंतर दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार भारती पवार येऊन गेल्या. राजकीय पुढारी आले, नेते आले. त्यांनी फक्त आश्वासन दिले. सुमारे साडेएकवीस लाख रुपयांचे नुकसान झाले असताना, राज्य शासनाने नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत केवळ पाच हजार रुपयांचा धनादेश देऊन तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला. यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्याने शासनाचा निषेध म्हणून मिळालेल्या तुटपुंजी मदतीचा धनादेश तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्या माध्यमातून शासनाला परत केला आहे.
नाशकाचे पालकमंत्री छगन भुजबळ 11 जुलैला येवला दौऱ्यावर असताना हा पाच हजार रुपयांचा धनादेश भुजबळांच्या हस्ते या शेतकऱ्याला देण्यात आला होता. नुकसान लाखात आणि शासनाची मदत हजारात, असे नुकसानग्रस्त शेतकरी गजानन देशमुख म्हणाले. तसेत त्यांनी शासनाचा निषेध व्यक्त करून भरीव मदत द्यावी, अशी मागणी या नुकसानग्रस्त शेतकऱ्याने केली आहे.