नाशिक - वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एका तरुण शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना मनमाडमधील वंजारवाडी येथे घडली. कांद्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता भाऊसाहेब जाधव (वय ३३ वर्ष) यांना ११ हजार व्होल्टेज विजेच्या तारेचा जबर धक्का बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा - केंद्राच्या मदतीची वाट न बघता राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत करावी - फडणवीस
शेतातून जाणारा वीज तारांचा खांब पडल्याची तक्रार जाधव कुटुंबीयांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यानेच भाऊसाहेबांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
हेही वाचा - कन्नड तालुक्यातील बळीराजा नैसर्गिक आघात विसरून पुन्हा लागला जोमाने कामाला
या घटनेमुळे मनमाडमधील नागरिकांमध्ये वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांबाबत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. भाऊसाहेबांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यावर कडक कारवाईसह कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.
हेही वाचा - कापूस वेचणीसाठी मजूर मिळेना, बळीराजाचे प्रश्न सुटेना
भाऊसाहेब जाधव ३३ वर्षांचे होते. त्यांच्यावर पत्नी, लहान मुलगा आणि आई-वडिलांची जबाबदारी होती. या कुटुंबाच्या उदर्निवाहासह मुलांच्या शिक्षणासाठी वीज वितरण कंपनीने आर्थिक साहाय्य करावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.