नाशिक - बागलाण तालुक्यातील राहूड येथील वयोवृद्ध शेतकरी पंडित भिका ठाकरे (वय 85) हे मंगळवारी (दि. 7 एप्रिल) सकाळी साडेआठच्या सुमारास दुसऱ्या गावी नातेवाइकांकडे जात असल्याचे सांगून शेतात गेले. पण, त्यानंतर ते परतलेच नाही. जेव्हा नातेवाईकांनी शोध घेतला तेव्हा त्यांचा मृतदेह शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
या शेतकऱ्याने शेतीच्या वादातून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. पंडित भिका ठाकरे (वय 85) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मृत ठाकरे मंगळवारी (दि.7) सकाळी साडेआठच्या सुमारास दुसऱ्या गावी नातेवाइकांकडे जात असल्याचे सांगून शेतात गेले. तेथेच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा शोध घेतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. ठाकरे यांच्या शेतीवर एकाने हक्क सांगितला. त्यावरून अनेक वर्षांपासून न्यायालयात खटला सुरु आहे. या वादातूनच ठाकरे यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. नामपूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विच्छेदन केले. आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांच्या नातेवाइकांनी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी घटनास्थळाची पाहणी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. याबाबत जायखेडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातवर; जिल्ह्यात कोरोनामुळे झाला पहिला मृत्यू