नाशिक - राज्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिक महानगरपालिकेला भेट दिली आहे. भेटी दरम्यान त्यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पालिकेच्या आरोग्य विभागातील रिक्त पदांची भरती लवकरच केली जाईल, असे सांगितले.
शहरातील रूग्णालये आणी आरोग्य परिस्थितीचा घेतला आढावा -
एकनाथ शिंदे यांनी आज नाशिक महानगरपालिकेला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयांमध्ये असणारी डॉक्टरांची कमतरता, शहरात स्वाइन फ्लूचे वाढते प्रमाण, डेंगू , मलेरिया या साथीच्या रोगांबाबत शहराची स्थिती याचा आढावा घेतला. आरोग्य विभागाकडून तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले आहेत.
आचारसंहितेपूर्वी आरोग्य विभागातील रिक्त पदांची जाहिरात केली जाईल -
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या सर्व पदांची भरती तात्काळ केली जाईल, विधानसभा निवडणूकसाठी अचारसंहिता चालू होण्यापूर्वीच भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय युतीचे वरिष्ठ नेते घेतील -
एकनाथ शिंदे यांनी पालिकाभेटी दरम्यान माध्यम प्रतिनीधींशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुख्यमंत्री पदाबाबत विचारले असता, "मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय युतीचे वरिष्ठ नेते घेतील. मुख्यमंत्री पदाबाबत बाकी कोणालाही बोलण्याचा अधिकार नसल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांचा दौरा राजकीय नसुन लोकसभा निवडणूकीत जो जनआशीर्वाद मिळाला त्यासाठी आभार मानण्यासाठी हा दौरा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे