नाशिक - म्हसरूळ परिसरातील सीता सरोवरात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुरूवारी रात्री अकरा-साडेअकराच्या सुमारास सीता सरोवरात पाच जण अंघोळीसाठी गेले होते. त्यातील चार युवक सरोवरात उतरले होते. त्यापैकी दोन तरूणांचा बुडून मृत्यू झाला आहे. हर्षल साळुंके (वय,३२), हेमंत गांगुर्डे (वय,३०) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
रात्री पाच जण याठिकाणी गेले होते. त्यातील चार जण सरोवरातील पाण्यात उतरले. या घटनेत दोघांचा बुडून मृत्यू झाला तर दोघांना सरोवरातील पाण्यातून बाहेर पडण्यात यश आल्याने त्यांचा जीव वाचला. पाचही युवक याठिकाणी कशासाठी गेले होते याबबत कुठलीही माहिती प्राप्त झालेली नाही. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून म्हसरूळ गावाच्या नजीक असलेल्या सीता सरोवर परिसरात अनेकजन मद्य प्राशन करण्यासाठी येथे येत असल्याची तक्रार स्थानिकांकडून होताना दिसते.