नाशिक : सततचा कडक उन्हाळा आणि पावसाने दिलेल्या ओढीमुळे नाशिक जिल्ह्यातील नागरीकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये केवळ २२ टक्के पाणीसाठा असून १३७ गावे वाड्या-वस्त्यांना ६३ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
टंचाईग्रस्त गाव-खेड्यांची संख्या वाढली : जूनचा शेवटचा आठवडा सुरू झाला असला तरी पावसाला सुरुवात झाली नसून, लांबलेल्या पावसामुळे टंचाईग्रस्त गाव-खेड्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आठवडाभरात तहानलेल्या गावांची संख्या 71 वरून 82 झाली आहे. जिल्ह्यात 1 लाख 33 हजार 82 नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. मान्सून लवकर दाखल न झाल्यास हा आकडा आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
जून महिना संपत आला तरी आम्हाला अजून टँकरनेच पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाने दडी मारल्याने आमच्यावर आज ही वेळ आली आहे. आम्ही आकाशकडे डोळे लाऊन बसलो आहोत. पाऊस कथी येईल याची आम्हाला चातकासारखी प्रतिक्षा आहे. धरणातही पाणी कमी असल्याने आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे - स्थानिक महिला
सर्वाधिक टँकर येवला तालुक्यात : नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये एकूण 63 टँकर रस्त्यावर धावत आहे. या टँकरच्या माध्यमातून 173 फेऱ्या सध्या सुरू असून टंचाईग्रस्त गावे,वाड्यांवरील लोकांची तहान भागवली जात आहे. तसेच वेगाने टँकरची संख्या फेऱ्या वाढवण्याची गरज भासू लागली आहे. यात सर्वाधिक 22 टँकर येवला तालुक्यात सुरू आहेत.
शहरात नियोजन कोलमडण्याची शक्यता : यंदा एल निनोमुळे पाऊस लांबण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. त्यामुळे शासनाने पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना दिल्या होत्या. पाऊस लांबल्यास धरणातील पाणीसाठा, तसेच उपलब्ध पाण्याचा ताळमेळ साधण्यासाठी बैठकही घेण्यात आली होती. त्यात ऑगस्ट अखेर पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, जूनमध्ये पाऊस पडेल असे गृहीत धरून पाण्याचा वारेमाप वापर सुरू आहे, त्यामुळे पाऊस लांबणीवर गेल्यास नियोजन कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात केवळ 31 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच जिल्ह्यातील धरण समूहात केवळ 22 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
शहराला 540 दशलक्ष घनफूट पाण्याची गरज : नाशिक शहराची सुमारे 20 लाख लोकसंख्या लक्षात घेता महानगरपालिकेकडून गंगापूर धरणातून दररोज सुमारे 500 ते 540 दशलक्ष घनफूट पाणी पुरवठा करण्यात येतो. गंगापूर धरणात सध्या 1 हजार 766 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. पाण्याची तुट भरून काढण्यासाठी कश्यपी, गौतमी, गोदावरी नदीतुन पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
हेही वाचा -