नाशिक - येथील पेठ ग्रामीण रुग्णालयामध्ये काही मद्यधुंद तरुणांनी डॉक्टरांनी धक्काबुक्की करत कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या मारहाणीच्या निषेधार्थ बुधवारी रुग्णालयातील सर्व डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. रुग्णालयाच्या आवारात करण्यात आलेल्या मारहाणीचे व तोडफोडीचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
पेठ ग्रामीण रुग्णालयात दोन मद्यधुंद तरुणांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत विनाकारण हुज्जत घातली व त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर रुग्णालयाच्या आवारात धिंगाणा घालणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना तरुणांकडून यावेळी मारहाणही करण्यात आली.
पेठ हा आदिवासी दुर्गम भाग असल्याने औषधोपचारासाठी ग्रामीण रुग्णालय हा एकच पर्याय येथील नागरिकांना आहे. मद्यधुंद लोकांकडून होणाऱ्या त्रासामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना तणावाखाली काम करावे लागत आहे. या घटनेचा निषेध म्हणून आज काम बंद आंदोलन करण्यात आले. मात्र, यामुळे यावेळी आलेल्या रुग्णांचे हाल झाले. समाजातील काही टवाळखोर लोकांमुळे डॉक्टरांना काम बंद करण्याची नामुष्की ओढावली असल्याचे ग्रामीण रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.