नाशिक - गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डी.के.नगर पोलीस चौकीत पोलिसांनी दारु पार्टी केल्याचं समोर आलं आहे. दारुड्यांच्या तक्रारीसाठी गेलेल्या नागरिकांसमोर पोलीसचं मद्यधुंद अवस्थेत होते. शिवाय त्यांनी मारहाण केल्याचा स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे.
नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डी के नगर भागात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांची तक्रार करण्यासाठी काही नागरिक चौकीत गेले होते. त्यांना पोलिसच ऑन ड्युटी दारू पार्टी करत असल्याचे दिसून आल्यानं धक्का बसला. नागरिकांनी हा प्रकार मोबाईल कॅमेरात कैद केला. मोबाईल शुटिंग करत असल्याचं लक्षात आल्याने पोलिसांनी तेथून धूम ठोकली. या घटनेची नाशिकमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. मद्यधुंद अवस्थेतील पोलिसांनी एका नागरिकाला मारहाण केल्याचा देखील आरोप होत आहे. आता या दारूड्या पोलिसांवर पोलीस आयुक्त काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.