नाशिक: जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे पाळीव श्वानांमध्ये लुळ्या आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. एक वर्षाच्या कुत्र्याच्या पिल्लांमध्ये तो अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. हा विषाणू पिल्लांचे श्वसन आणि मज्जासंस्थेवर परिणाम करतो. तर पशु चिकित्सकांनी सांगितले की, या आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. तसेच श्वानांची जागा निर्जंतुक ठेवणे व लक्षणे दिसतात तात्काळ उपचार करायला हवे असेल पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
लुळ्या संसर्गाची लक्षणे: यात कुत्र्याला ताप येणे, नाकातून पाणी गळणे, डोळ्यातून पाण्यासारखा द्रव येणे, उलट्या, खोकला येणे, खाण्याची क्षमता कमी होणे, पोटाखाली पिवळे फोड येणे तसेच पायाला, चेहऱ्याला, स्नायूला सातत्याने झटकेत येणे, ब्रेन डॅमेज होते. रक्तातील पांढऱ्या पेशी कमी होऊन मृत्यू देखील ओढवू शकतो.
संसर्गजन्य आजार: लुळ्या हा संसर्गजन्य आजार आहे. विषाणू पासून पसरणारा हा आजार असून कुत्रे एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे तो पसरतो. त्यासोबतच रक्त, लाळ, युरीन एकमेकांचे अन्न खाणे व हवेतून हा आजार पसरतो. या आजाराच्या संसर्गापासून बचावासाठी देण्यात येणारे कॅनग्लोब डी हे इंजेक्शन साडेतीन हजार रुपयांना मिळते. एलव्हेन इन वन ही लस दोन हजारात बाजारात उपलब्ध आहे.
श्वानांचे लसीकरण करा: लुळ्या आजाराचा संसर्ग वाढत आहे.आमच्याकडे दर महिन्याला 25 ते 30 श्वान या आजाराने पीडित येत असतात. यावर श्वानाचे पिल्लू 42 दिवसाचे झाल्यानंतर टेन इन वन ही लस द्यावी, 21 दिवसांनी दुसरी मात्रा त्यानंतर 21 दिवसांनी तिसरी मात्रा घ्यावी, तीन महिन्यांनंतर रेबीची लस व चौथ्या महिन्यात बूस्टर डोस घ्यावा असे पशुधन विकास अधिकारी सांगतात.
भटक्या कुत्र्यांचं काय: लुळ्या हा आजार संसर्गजन्य असल्याने हा सर्वत्र झपाट्याने पसरत आहे. या आजाराची लक्षणे आढळल्यास पाळीव श्वान मालक तात्काळ त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात धाव घेतात, मात्र दुसरीकडे रस्त्यावर फिरणारी भटक्या कुत्र्यांनकडे लक्ष देण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याचे चित्र आहे. अशात काही सामाजिक संस्था भटक्या श्वानांसाठी काम करत असल्या तरी लसीकरणासाठी येणारा खर्च मोठा असल्याने आणि भटक्या कुत्र्यांची संख्या अधिक असल्याने, नाईलाजाने त्यांच्याकडे कोणीच बघत नसल्याचे चित्र शहरात बघायला मिळत आहे.