नाशिक- गुळवंच येथील चारा छावणीला जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी अचानक भेट दिली आणि त्यानंतर जनावरांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी करत आढावा घेतला.
सिन्नर तालुक्यातील गुळवंच व आडवाडी या दोन ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी जनावरांसाठी चाऱ्याची व पाण्याची व्यवस्था केली जात आहे, की नाही, हे पाहण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी चारा छावणीला अचानक भेट दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याचा विचार करून आवश्यक सुविधा पुरविण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. छावणी चालकांनी सीसीटीव्ही कॅमेरे, बारकोड बाबतच्या तक्रारी केल्यानंतर शासनाने नविन पर्याय सुचविण्यात आले असल्याचेही मांढरे यांनी सांगितले.
यावेळी ग्रामविकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विष्णु सानप, सचिव अर्जुन आव्हाड, भगवान सानप ,भाऊसाहेब शिरसाठ, मारुती आव्हाड आधी शेतकरी उपस्थित होते. गुळवंच येथे 397 तर आळवाडी येथे 681, अशी एकूण 1078 जनावरे चारा छावणीमध्ये दाखल आहेत.