नाशिक - गिरणारे येथील गोंधळ झालेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षा केंद्राला जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी भेट देत पाहणी केली आहे. घडलेल्या प्रकाराबाबत आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल पाठवणार असून उघडलेल्या सीलबंद पेट्या आणि खासगी वाहनातून आलेल्या प्रश्नपत्रिका आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पेपर खासगी वाहनातून आले असले तरी पेपर फुटले नाही, असा दावा जिल्हाधिकारी मांढरे यांनी केला आहे.
'पेपर फुटला नसून उशिरा आल्याने गोंधळ'
पेपर फुटला नसून उशिरा आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांनी परिक्षेवर बहिष्कार टाकायला नको होता. न्यासा या खासगी कंपनीकडे परिक्षाची जबाबदारी असून त्यामुळे खासगी वाहनाने पेपर आलेत. याबाबत आरोग्याच्या वरिष्ठ विभागाकडे अहवाल पाठवणार आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करणार, अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण?
आरोग्य विभागाच्या वतीने आज राज्यभरात विविध केंद्रांवर परिक्षा घेतली जात आहे. दोन आठवड्यांपुर्वी भोंगळ कारभारामुळे नियोजीत परिक्षा रद्द करण्याची नामुष्की आरोग्य विभागावर ओढावली होती. मात्र आज देखील अनेक परिक्षा केंद्रावर नियोजनाचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. गिरणारे परिक्षा केंद्रावर हीच परिस्थिती पहायला मिळाली. पेपर कमी आल्याने गिरणारे केंद्रावर गोंधळ उडाला. पेपर केंद्रावर आणताना काळजी घेण्यात आली नाही असा आरोप विध्यार्थ्यांनी केला आहे. केंद्रावर पेपर आणणाऱ्या तरुणांकडे आईडी कार्ड देखील नव्हते असा अरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे पेपर प्रक्रिया राबवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
हेही वाचा - आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार : नाशिकमधील गिरणारे केंद्रावर उडाला गोंधळ