नाशिक - जिल्ह्यात परतीच्या पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. बुधवारी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नाशकातील द्राक्ष उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे. परतीच्या पावसामुळे द्राक्षावर डाऊनी, मिलोडी यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. सरकारने द्राक्ष बागांचे पंचनामे करून 100 टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
परतीच्या पावसामुळे नांदूर गावातील दत्तात्रय निमसे या शेतकऱ्यांच्या शेतातील द्राक्ष बागांचे होत्याचे नव्हते झाले. कर्ज काढून दोन महिन्यांपूर्वी त्यांनी द्राक्षाच्या काळ्या मण्यांचा बाग उभा केला होता. मात्र, परतीच्या पावसामुळे द्राक्ष बागाचे होत्याचे नव्हते झाले. द्राक्ष बागांवर बुरशी, डाऊनी, मिलोडी यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. एवढ्यावरच निमसे यांचे संकट थांबले नाही, तर गोगल गायने मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागावर हल्ला चढवत द्राक्ष बागांचे पानं खाऊन टाकले आहेत.
द्राक्ष बागांमध्ये पावसामुळे गुडघाभर चिखल झाला आहे. त्यामधून साधे चालणे देखील मुश्किल झाले आहे. औषध फवारणी करुनही पीक हातात येईल की नाही? याची शंका त्यांच्यासमोर आहे. निमसे यांच्यासारखी परिस्थिती जिल्ह्यातील प्रत्येक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची आहे. प्रशासनाने लवकारात लवकर नुकसानीचे पंचनामे करून 100 टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.