नाशिक - दिंडोरी व पेठ तालुक्यामध्ये हापूस, राजापुरी आणि गावरान आंब्याची मोठया प्रमाणात लागवड आहे. मात्र, यावर्षी झालेल्या अवकाळी पावसाचा आणि निसर्ग चक्रीवादळाचा आंबा पिकाला फटका बसला आहे. गावरान आंब्याच्या उत्पादनामध्ये ८०ते ८५ टक्क्यांनी घट झाली आहे. तर कोरोना विषाणूमुळे गुजरात व महाराष्ट्राच्या सीमा बंद असल्याने लोणच्याची कैरी आणण्यासाठी व्यापारी गुजरातला जाऊ शकले नाही. त्यामुळे स्थानिक राजापूरी आणि गावराण आंब्याला प्रचंड मागणी वाढली आहे.
दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांनी आपल्या शेताच्या बांधावर व पडीक जमिनीत राजापूरी, हापूस, लंगडा, पायरी आणि गावराण आंब्याची लागवड केलेली आहे. हे आंबे दिंडोरी, वणी, उमराळे व ननाशी मोठ्या बाजारपेठेत विक्रीसाठी येत असतो. मात्र, यावर्षी लोणच्यासाठी उपयुक्त असलेल्या गावराण आंब्याचा तुटवडा जाणवत आहे.
यावर्षी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाखा, अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे कच्च्या कैऱया गळून पडल्या आहेत. यात आंबा व्यावसायीकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर उत्पादन कमी असल्याने साहजिकच मागणी जास्त होत आहे. यामुळे लोणच्याची गावरान कैरी ही ४० ते ८० रुपये दराने विकली जात आहे तर पिकलेल्या आंब्यांचा दर १०० ते १२० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे.
वणी, ननाशी, उमराळे हा भाग जंगली मेव्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील बाजारात करवंदे, जांभूळ, आळीव हा जंगली मेवा विक्रीसाठी दाखल झाला आहे. दिंडोरी, वणी व नाशिक शहरातील नागरिक हे सकाळी रांग लावून लोणच्यासाठी कैऱ्या विकत घेताना दिसत आहेत.