नाशिक - देशात लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान झाले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार भारती पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे धनराज महाले आणि माकपचे जे. पी. गावित यांनी आपल्या मुळ गावी मतदान करून मतदानाचा हक्क बजावला.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या महिला उमेदवार डॉ. भारती पवार यांनी आपल्या कळवण तालुक्यातील दळवट या सासरच्या गावी आपल्या पती आणि नातेवाईकांसोबत मतदानाचा हक्क बजावला. दळवटच्या जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळेत त्यांनी सकाळी मतदान केले. अगोदर त्यांनी गावातील मारुतीच्या मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले त्यानंतर मतदान केले. महिलेला उमेदवारी दिल्याने भारती पवार यांनी यावेळी भाजपचे आभार मानले. स्त्रियांनी राजकारणात यायला हवे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार धनराज महाले यांनी दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावी मतदानाचा हक्क बजावला. नागरिकांना मतदान करण्याचे त्यांनी आवाहन केले. भाजपच्या काळात मतदारसंघात काहीच विकास झाला नसून मी नक्कीच बदल घडून दाखवेन, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
नाशिकच्या दिंडोरी लोकसभेसाठी सकाळपासून मतदान सुरू झाले आहे. या मतदारसंघात १७ लाख २८ हजार मतदार आहेत. तर या मतदारसंघात जवळपास ४ हजार मतदान केंद्र आहेत.