नाशिक - जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात मद्यधुंद अवस्थेत लोटांगण घालणाऱ्या त्या मद्यपी शिक्षकाचा अखेर निलंबन करण्यात आले आहे. या शिक्षकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ही कारवाई केली आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात वैतरणा जवळ असलेल्या दापूर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये वरिष्ठ शिक्षक म्हणून नियुक्त असलेल्या प्रकाश चंद्रे या मद्यपी शिक्षकावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रे हे आपल्या शाळेतील वर्गामध्ये मद्यधुंद अवस्थेत लोटांगण घालत होते. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान काही ग्रामस्थांनी या संतापजनक प्रकरणावरून कारवाईची मागणी केली होती. याचीच दखल घेत याप्रकरणी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी मद्यपी शिक्षकाला निलंबित केले असल्याचे, शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी सांगितले आहे.
'असे प्रकार पुन्हा घडू नये'
दरम्यान शिक्षकाच्या या संतापजनक वर्तणुकीमुळे आता आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र याप्रकाराची गांभीर्याने दखल घेत प्रकाश चंद्रे या शिक्षकाची तातडीने उचलबांगडी करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. तर यापुढे असे प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी देखील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा -दारुसाठी आईचा खून, मृतदेहाचे तुकडे करुन काढले काळीज, नराधम मुलाला फाशीची शिक्षा