नाशिक- जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या दीपक सातपुतेला रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार विक्री केल्या प्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर मधील गरीब रुग्णांसाठी मोफत दिले जाणारे रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार विक्री होत असलेल्या तक्रारी जिल्हाधिकारी यांना प्राप्त झाल्या होत्या. याची गंभीर दाखल घेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या प्रकरणी तातडीने चौकशी करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांना दिले होते. यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती. या प्रकरणात दीपक सातपुते याने एक रेमडेसिवीर इंजेक्शन विक्री केल्याची कबुली दिल्यानंतर सातपुते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील औषध व इंजेक्शन काळ्याबाजारात विक्री होणे गंभीर प्रकार आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांनी सांगितले. गरीब रुग्णांसाठी असलेल्या औषधे इंजेक्शन विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वीही जिल्हा रुग्णालयात होत आल्या आहेत. मात्र, त्याचे कुणाकडे पुरावे नसल्याने हा प्रकार सर्रास सुरू असल्याची चर्चा आहे.