नाशिक - जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवगावात दोन विहिरींमध्ये मृतदेह आढळले आहेत. मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तीनही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, आत्महत्या की घातपात हे अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा - Manmad Crime : दारुड्या भावाच्या त्रासाला कंटाळून बहिणीने केला खून
देवगाव शिवारातील पोटे वस्तीनजिक 25 तारखेला पायल रमेश पोटे (वय 19) या तरुणीचा विहिरीच्या पाण्यावर मृतदेह तरंगताना आढळून आला. याबाबत देवगावचे पोलीस पाटील सुनील बोचरे यांनी लासलगाव पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत महिलेचे नातेवाईक येईपर्यंत मृतदेह काढण्यास उपस्थितांनी विरोध केला. नातेवाईक आल्यानंतर मृतदेह काढण्यात आला. नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश व संताप बघता अधिक कुमक मागवून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
मृत महिलेला अवघ्या सहा महिन्यांची मुलगी असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याच दरम्यान पाण्यावर पुरुषाच्या चपला तरंगत असल्याने विहिरीत अजून कुणी आहे का? हे शोधण्यासाठी पाण्याचा उपसा करण्यात आला असता काही तासांनी संदीप एकनाथ पोटे (वय 27) यांचा गाळात फसलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मृत पायल आणि संदीप यांच्यात दीर भाऊजईचे नाते होते.
दुसऱ्या घटनेत देवगाव परिसरातील कासली शिवारात एका विहिरीनजिक मोटरसायकल, मोबाईल, चपला आढळून आल्या. विहिरीच्या पाण्याचा उपसा केला असता प्रणित दत्तात्रय बोचरे (वय 22) याचा मृतदेह आढळून आला. या दोन वेगवेगळ्या घटनांनी देवगावात खळबळ उडाली आहे. लासलगाव पोलीस स्टेशनला याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संबंधित घटना आत्महत्त्या की घातपात याबाबत पोलीस तपास करत आहे.
हेही वाचा - नाशिक शहरातील बाराशे जुने वाडे, धोकादायक इमारतींना मनपाची नोटिस