येवला (नाशिक)- येवल्यातील वीज ग्राहकांना तीन महिन्याचे वीज बिल एकाच वेळेस आले आहे. मात्र, ते एकत्र भरणे सामान्य नागरिकांना शक्य नाही. त्यामुळे बिल तीन टप्प्यात आकारावे, अशी मागणी शिवसेना तालुका समन्वयक धीरजसिंग परदेशी यांनी केली आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे मागील तीन महिन्यांपासून वीजेची रिडिंग घेतली नव्हती. आता अनलाॅकनंतर रिडिंगची नोंद झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना एकत्र तीन महिन्यांचे बिल आले आहे. सर्वसामान्य ग्राहकांना हे एकत्रित आलेले बिल भरणे शक्य नाही. त्यामुळे या बिलात सवलत मिळावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
महावितरणाकडून ज्यांना एकत्रित वीज बिल मिळाले आहे. ते रद्द करण्याची ग्राहकांची मागणी धीरजसिंग परदेशी यांनी महावितरणाकडे केली आहे. या मागणीचे निवेदन महावितरण अधिकारी डोंगरे यांना देण्यात आले आहे. तसेच मागणी मान्य न झाल्यास 30 जून रोजी महावितरण कार्यालयाबाहेर उपोषण करणार असल्याचा इशारा परदेशी यांनी दिला आहे.