नाशिक - शाळेतील लोखंडी कपाट अंगावर पडून जयेश अवतार (वय १२) ह्या सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नामांकित मराठा हायस्कूलमध्ये ही घटना घडली असून शाळेच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. तर, याबाबत सखोल चौकशी करणार असल्याचे शाळा संचालकांनी म्हटले आहे.
नाशिकच्या क्रांतीनगर मधील वैभवलक्ष्मी सदनिकेमध्ये राहणारा जयेश, हा गंगापूर रोड येथील मराठा हायस्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकत होता. घरातून जाताना 'लवकर येतो' म्हणून तो शाळेत निघाला. त्याचा वर्ग नवीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर होता. मधल्या सुट्टीत पाऊस सुरू असल्यानं खूप कमी मुलं मैदानात होती. डबा खाऊन सगळे विद्यार्थी इमारतीचा व्हरांडा आणि वर्गातच खेळत होती. तेवढ्यात मोठा आवाज झाला, आणि मुलं आणि शिक्षक आवाजाच्या दिशेने पळाले. तेव्हा विविध साहित्य ठेवलेले लोखंडी कपाट जयेशच्या अंगावर पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी लगेच जयेशला बाहेर काढत त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वीच सर्वांच्या लाडक्या जयेशने जगाचा निरोप घेतला होता.
शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच ही घटना घडली. मुळात, विद्यार्थी शिकत असलेल्या वर्गात असे जड वस्तू ठेवलेले कपाट ठेवलेच कसे? असा प्रश्न उपस्थित करत बेजबाबदार शिक्षकांवर कारवाई व्हावी, असा आरोप जयेशच्या पालकांनी केला आहे.
कपाट अंगावर पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे समजताच धक्का बसला. शाळेच्या मुख्याध्यापिकांसह जिल्हा रुग्णालयात जाऊन मुलाच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. ही दुर्दैवी घटना असून याबाबत संबंधितांची सखोल चौकशी केली जाईल. तसेच, कुटुंबाला योग्य ती मदत करण्यात येईल, असे मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी सांगितले.