नाशिक - जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे लसीकरण केंद्रामध्ये गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शासन स्तरावर या रोगाचा पादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनाही केल्या जात आहे. मात्र, नागरिकांकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र पिंपळगाव येथील लसीकरण केंद्रावर दिसून आला. यामुळे कोरोनाग्रस्तांचा मोठा विस्फोट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी नागरिकांची मागणी
जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून प्रत्येक नागरिक आपण सुरक्षित राहावे यासाठी लसीकरण केंद्रामध्ये लस घेण्यासाठी गर्दी करत आहे. एक व्यक्तीच्या लसीकरणासाठी किमान 15 मिनिटे वेळ लागतो. त्यामुळे नाेंदणी करणाऱ्यांची व नाेंदणी न केलेल्यांचा प्रचंड गोंधळ उडाला असून, लसीकरण केंद्रांवरील गर्दी हळूहळू वाढू लागली आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नियमांचे पालन करावे
प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस मिळणार आहे. लसींचा मुबलक साठा असून नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये व नियमांचे पालन करावे, असे आवाहन आशिष बागुल यांनी केले आहे.
हेही वाचा - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये कडक अंमलबजावणी - जिल्हाधिकारी