येवला (नाशिक) - शहरासह तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला असून या पावसामुळे पिकांमध्ये पाणीच पाणी साचले आहे. शहरातील अनेक घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पावसामुळे पिकांचे नुकसान -
येवला शहरासह परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला असून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांमधील बंधारे, नदी, नाले तुडूंब भरून वाहू लागले आहे. तर बळीराजने मोठ्या कष्टाने शेतात पिकवलेल्या मिरची, मका, बाजरी, सोयाबीन या उभ्या पिकात पाणीच पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या पावसामुळे होत असल्याचे चित्र सध्या येवला तालुक्यात दिसत आहे.
घरात व दुकानात साचले पावसाचे पाणी -
शहरातील साईबाबा मंदिरामागील परिसर तसेच बुरुड गल्ली या भागातील रहिवाशांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने सर्व सामान भिजले गेले आहे. तसेच शनीपटांगण, गणेश मार्केट परिसरात नाल्याचे पाणी आल्याने अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पूल पाण्याखाली वाहतूक बंद -
तालुक्यातील अनेक रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्कदेखील तुटला गेला आहे. येवला-नगरसुल रोडवरील भामना नदीला पूर आल्याने सर्व वाहतूक ठप्प झाली होती. तसेच येवला- भारम रस्त्यावरील नागडे गावातील नारंदी नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते. त्याचप्रमाणे तालुक्यातील अनेक गावातील रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने रहदारी ठप्प झाली आहे.
अस्तीसाठी गुडघाभर पाण्यातून जाण्याची वेळ -
येवला शहरासह परिसरात पावसाने धुमाकूळ घातला असून शहरातील अमरधाममध्ये प्रवेश करणाऱ्या रोडवर पाणीच पाणी असल्याने काल शहरातील एका कुटुंबातील व्यक्तीचा अंत्यविधी झाला होता. आज अस्ती आणण्याकरिता जात असताना अक्षरशः गुडघाभर पाण्यातून जाण्याची वेळ या कुटुंबावर आली आहे, तर अमरधाम मध्येही पाणीच पाणी झाल्याचे चित्र आहे.