नाशिक - शहरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत आहे. मागील ३ महिन्यात शहरात १२ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याने महानगरपालिकेचे आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे. रुग्णाला स्वाइन फ्लूचे लक्षण असल्यास खासगी डॉक्टरने टॅमी फ्लूच्या गोळ्या देणे अपेक्षित आहे. मात्र, खासगी डॉक्टरांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू होत असल्याची बाब तपासाअंती समोर आली आहे. त्यामुळे स्वाइन फ्लू उपचाराबाबत हलगर्जीपणा केल्यास खासगी डॉक्टरांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गायकवाड यांनी दिला आहे.
वातावरणातील बदलामुळे जानेवारीपासून स्वाइन फ्लूने पुन्हा एकदा डोक वर काढले आहे. मागील ३ महिन्यात नाशिक जिल्ह्यात १६१ रुग्णांना स्वाइन फ्लूची बाधा झाली आहे. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील ७९ रुग्णांचा स्वाइन फ्लूचा रिपोर्ट पॅाजिटिव्ह आला आहे. स्वाइन फ्लू प्रतिबंधासाठी महानगरपालिकेने १४ ठिकणी स्क्रिनिग सेंटर सुरू केले आहे. मार्चपर्यंत२७०५ रुग्णांची स्क्रिनिग करण्यात आली आहे. त्यापैकी ३१५ रुग्णांना टॅमी फ्लूची औषधे देण्यात आली आहेत.
मागील वर्षी या तीन महिन्यात स्वाइन फ्लूमुळे एकाचा मृत्यू झाला होता. मात्र, यावेळी हा आकडा १२ वर गेला आहे. हे मृत्यू का वाढले याचा महानगरपालिका आरोग्य समितीकडून अहवाल घेण्यात आला आहे. यामध्ये असे दिसून आले की, स्वाइन फ्लू रुग्ण हे खासगी रुग्णालयात जातात आणि योग्य निदान न झाल्याने ८ ते १० दिवसात त्या रुग्णांची प्रकृती खालावते नंतर त्याचा मृत्यू होतो. जर वेळेत स्वाइन फ्लू रुग्णांना टॅमी फ्लूची औषधे दिले तर त्याचा जीव वाचू शकतो. मात्र, बऱ्याच प्रकरणात खासगी डॉक्टरकडून निदान होत नसल्याचे महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गायकवाड यांनी सांगितले. याबाबत शहरातील खासगी डॉक्टरांना मार्गदर्शन केले जाणार आहे. भविष्यात खासगी डॉक्टरकडून रुग्णांच्या उपचाराबाबत हलगर्जीपणा आढळून आल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई देखील केली जाणार असल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले आहे.