नाशिक - जिल्ह्यात विकेंड लाॅकडाऊन असूनही ट्रेकींगसाठी घराबाहेर पडत हरिहर गड व कश्यपी धरणावर गिर्यारोहक व पर्यटकांनी तोबा गर्दी केली आहे. त्यामुळे विकेण्ड लॉकडाऊन असतांनाही पर्यटनासाठी गडावर गेलेल्या पर्यटकांवर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तब्बल ५० जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरिहर गड व कश्यपी डॅमवर तोबा गर्दी
शासनाने नाशिक जिल्ह्याला तिसर्या टप्प्यात ठेवले असून शनिवार व रविवारी विकेण्ड लाॅकडाऊन कायम आहे. असे असताना हौशी पर्यटकांनी सीमोल्लंघन करत त्र्यंबकेश्वर येथील हरिहर गड व कश्यपी धरनावर तोबा गर्दी केली होती. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी पर्यटकांवर थेट गुन्हे दाखल केले असून, नियम मोडणार्यांची गय केली जाणार नाही. असा संदेशच या कारवाईतून देण्यात आला आहे.
पोलिस बंदोबस्त असतानाही पर्यटकांची गर्दी
नाशिक जिल्ह्यात कोरोना नियम धाब्यावर बसवत जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत आहेत. ग्रामीण भागात कोरोणाचा प्रादुर्भाव अधिक असताना, पर्यटकांचा उत्साहीपणा घातक ठरू शकतो. म्हणून पर्यटनाच्या सर्वच ठिकाणी ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त असताना देखील पर्यटक गर्दी करत आहेत. या गर्दीमुळे पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी पर्यटकांवर थेट गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरू केली आहे.
हेही वाचा - No Entry: नाशिकच्या इगतपुरीत पर्यटनासाठी येणाऱ्यांना पोलिसांकडून घरचा रस्ता