दिंडोरी (नाशिक) - तालुक्यातील वरवंडी शिवनई येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गाय ठार झाली आहे. बाळकृष्ण पांडूरंग जाधव यांच्या घराजवळ ही घटना घडली. या हल्ल्यात एक श्वानाचाही मृत्यू झाला आहे.
वरवंडी शिवनई तसेच जानोरी परिसर डीआरडीओ परिसरालगत आहे. डीआरडीओमध्ये पूर्ण जंगल असल्यामुळे याठिकाणी बिबट्यांचा मुक्त संचार आहे. मात्र, त्या परिसरात आता पाणी आणि त्यांना अन्नाची टंचाई भासू लागल्याने ते पूर्णतः नागरी वस्तीकडे पलायन करू राहिले आहे. या बिबट्याचा परिसरात अतिशय धुमाकूळ आहे. यामुळे शेतात रात्रीची वीज आहे तरी शेताला पाणीसुद्धा देता येत नाही आहे. शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी गाय, म्हैस, श्वान, शेळ्या मेंढ्या इत्यादी प्राण्यांवर हल्ला करून त्यांना ठार केल्या केल्याच्या घटना घडत आहेत.
हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये दिलासा; 'या' चार शहरामध्ये सुरू होणार उबेरची प्रवास सेवा
वरवंडी येथील रस्त्यालगत असलेल्या वस्तीवर रात्रभर बिबट्याने धुमाकूळ घालून एक गाय फस्त केली आहे. या गोष्टीकडे वन विभाग जाणून-बुजून कानाडोळा करत आहे. वनविभाग फक्त दिंडोरी तालुक्यात आता नावापुरते उरले आहे. कारण, दिंडोरी तालुक्यात बिबट्याचे हल्ले खूप वाढले आहेत. म्हणून या हल्ल्यांना कोण जबाबदार आहे? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहेत.