नाशिक - देवळा तालुक्यातील मेशी येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या महिलेचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गाव आजपासून रविवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.
मेशी येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी आलेली महिला आजाराच्या लक्षणांवरून कोरोना संशयित वाटल्याने तिच्या घशातील श्रावाचे नमुने घेण्यातआले आणि तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र त्यानंतर लगेचच या महिलेचा मृत्यू झाला. आज या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला मुंबई येथील असून फुलेंनगर ( वासोळ पाडे) येथे दोन-तीन दिवसांपूर्वीच आली होती.
या घटनेमुळे आता गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधित महिला गावात नुकतीच आली असल्याने अन्य नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, मात्र प्रत्येकाने खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. गाव आजपासून रविवारी सायंकाळीपर्यंत खबरदारी म्हणून बंद करण्यात आले असून सर्व नातलग आणि संपर्कातील व्यक्तींना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच घरोघरीदेखील स्थानिक वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत तपासणी सुरू करण्यात आली आहे.