नाशिक - कोरोना संसर्गाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या तुलनेत नाशिकमध्ये मृत्यूदर कमी आहे. नाशिक १२ व्या क्रमांकावर आहे. येथील बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये ५ व्या, तर रुग्णसंख्येच्या बाबतीत ७ व्या क्रमांकावर आहेत. मात्र, हा आकडा शून्यावर येईपर्यंत शासन-प्रशासनाच्या स्तरावर प्रयत्नांची शिकस्त करत राहू, अशा विश्वास पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. तसेच शासकीय लॅबसह नाशिक शहरात प्लाझ्मा संकलनाचे काम तत्काळ सुरू करावे, अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले, कोरोना बाधितांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. मात्र, या माध्यमातून आपण वेळीच बाधितांपर्यंत पोहचत आहोत. तसेच त्याला गृह अथवा संस्थात्मक विलगीकरणात ठेवून त्यापासून होणाऱ्या संभाव्य संसर्गाला आपण नियंत्रणात आणतो आहोत. वाढती रुग्णसंख्या ही आपल्या चोख कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्यवस्थापनाचे यश आहे. आजच्या स्थितीत राज्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्येही आपण राज्यातील इतर शहर आणि जिल्ह्यांच्या तुलनेत अत्यंत वेगाने काम करत आहोत.
जिल्हा रुग्णालयात सरकारी लॅबच्या निर्मितीचे जे काम सुरू झाले होते ते अंतिम टप्प्यात आहे. येत्या १५ दिवसाच्या आत लॅब सुरू कशी होईल? याकडे जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या प्रशासनाने लक्ष केंद्रीत करावे तसेच शहरातील काही लॅबोरेटरीजला परवाने देऊन त्यांच्या माध्यमातून कोरोना उपचारासाठी भविष्यात प्लाझ्मा संकलनाचेही काम तत्काळ सुरू करावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या.
तर नाशिक शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढली आहे. अशा भागात कंटेंटमेंट झोनची अंमलबजावणी अत्यंत कडक करण्यात यावी. हे करत असताना केल्या जाणाऱ्या कारवाईला मानवी चेहरा असावा. त्याचबरोबर शहरात ज्या ठिकाणी निर्बंध नाहीत त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे, अशा ठिकाणी पोलिसांनी गर्दी होणार नाही त्यासाठीचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे.
वेळोवेळी अशा ठिकाणी पोलिसांनी गस्त ठेवून नागरिकांना आणि दुकानदारांना गर्दी होणार नाही, त्यासाठी सूचना द्याव्यात. सायंकाळी 7 वाजेनंतर संचारबंदीचे काटेकोर पालन करण्यात यावे. 5 वाजता स्वयंस्फुर्तीने दुकाने बंद करून 7 वाजेच्या आत सर्व व्यवहार, आणि जीवनावश्यक सेवा वगळता बंद करणे, फिजिकल डिस्टन्सिंगसोबतच मास्क न वारणाऱ्यांवर कडक कारवाईच्या सूचना, यावेळी मंत्री भुजबळ यांनी दिल्या.
तर येणाऱ्या काळात लागणारी बेडची गरज लक्षात घेऊन मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयात ३५०, एसएमबीटी कॉलेज येथे १०० बेड उपलब्ध होऊ शकतात. त्याबातचे नियोजन तात्काळ करण्यात यावे, त्यासाठी लागणारा मनुष्यबळ, वैद्यकीय साधने, औषधोपचार, रूग्णांचा आहार, तत्सम सुविधांसाठी लागणारा खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे.
नाशिक महानगरालिकेच्या कोविड सेंटरमध्ये लागणाऱ्या अतिरिक्त मनुष्यबळासाठी तत्काळ भरती करण्यात यावी. तसेच आयएमएच्या तज्ज्ञ डॉक्टरांचीही त्यासाठी मदत घेण्यात यावी. खाजगी रुग्णालयातून उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या अडचणी सोडविण्यासाठी समन्वयक डॉक्टरांच्या नेमणुका करण्यात याव्यात. शासकीय रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण हे सर्वसामान्य गरीब जनता आहेत. शासनाकडून येणाऱ्या नवीन औषधांचा वापर शासकीय रुग्णालयांसाठी प्राधान्याने करण्यात यावा, महापालिकेच्या बिटको रुग्णालयात ४०० बेडची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. तर अन्य महापालिका ज्याप्रमाणे याबाबत काम करीत आहेत तसेच काम नाशिक महापालिकेनेही करावे, असेही ते म्हणाले.
नाशिक जिल्हा, शहर आणि मालेगावमधील ज्या ज्या भागातील रूग्णालयांमधून कोरोना संसर्गित बरे झाले आहेत अशा भागातील आणि रुग्णालयातील अनुभवी डॉक्टरांचा रुग्णांच्या उपचारासाठी वापर करावा. ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व टेलीमेडिसिनसारख्या माध्यमांच्या द्वारे या डॉक्टरांची मदत घ्यावी, असेही ते यावेळी म्हणाले. कोमॉर्बिड रुग्णांबाबत अतिदक्षता घेण्यात यावी. कुठल्याही परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना मृत्यु शुन्यावर कसा येईल, यासाठी भविष्यात सर्वांनी नियोजन करावे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, शासन प्रयत्नशील आहेत. आपणही त्यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी दिल्या.