नाशिक : जिल्ह्याच्या येवल्यातील अंकाई किल्ला परिसरात सतत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मूग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे परिपक्व मुगाच्या शेंगा भिजून गेल्याने खराब झाल्याने उभ्या पिकात जनावरे चरण्यास सोडून देण्याची वेळ दयाराम भिडे या शेतकऱ्यावर आली आहे.
येवला तालुक्यातील अंकाई किल्ल्यासमोरील शेतकरी दयाराम भिडे यांनी एक एकरात मुगाचे पीक घेतले होते. मात्र, काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या शेतकऱ्याचे मुगाचे पीक चांगल्या प्रकारे आले होते. मात्र, या सततच्या पावसामुळे मुगाचे पीक पूर्णपणे खराब झाले. यामुळे, अक्षरशः हतबल झालेल्या शेतकऱ्यांवर उभ्या मुगाच्या पिकात जनावरे चरण्यास सोडून देण्याची वेळ आली आहे. सध्या मुगाला चांगल्याप्रकारे भाव आहे. मात्र, सततच्या पावसामुळे नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली आहे.
तसेच या शेतकऱ्यानी कांद्याचे रोप टाकले होते. मात्र, सततच्या पावसामुळे हे कांद्याचे रोपसुद्धा खराब झाल्याने शेतकऱ्याला आता कांदा लागवड करता येणार नाही. यामुळे आधीच कोरोनाच्या सावटाखाली आर्थिक नुकसान झेलत असलेल्या शेतकऱ्यांसमोर पावसाच्या माऱ्याने आता इतका खर्च कसा भरून काढायचा? असा प्रश्न उभा ठाकला आहे.