नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या स्मार्ट सिटीच्या स्मार्ट रोड विरोधात नाशिकमध्ये काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील यांच्यासह नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.
नाशिक शहरात पावणे दोन वर्षांपासून स्मार्ट रोडचे काम सुरू आहे. ३१ मार्च ला या कामाचा कालावधी संपला असला तरी काम पूर्ण झालेले नाही. कंत्राटदाराला नोटीस देऊनही कामात प्रगती होत नसून निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा आरोप हेमलता पाटील यांनी केला आहे. याशिवाय १७ कोटींचे काम २० कोटींवर विनापरवानगी कसे केले? असा प्रश्न उपस्थित केला आहे. स्मार्ट रोडच्या कामाचा निषेध करत स्मार्ट सिटीच्या नावाखाली संचालक मंडळ नाशिककरांकडून पैसे उकळत असून स्मार्ट कंपनी भ्रष्टाचार करत असल्याचा गंभीर आरोपही पाटील यांनी केला आहे.