नाशिक - येथे महानगरपालिका हद्दीतील ४ प्रतिबंधित क्षेत्रात आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी वैद्यकीय पथकासह पाहणी करून त्या ठिकाणी विविध प्रकारची कामे करण्याचे आदेश आरोग्य विभाग, आरोग्य वैद्यकीय विभाग व विभागीय अधिकारी यांना दिले.
नाशिक महानगरपालिका हद्दीत ६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर शहरातील ४ भागातील परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यामधील मालपाणी सेफ्रॉन, पाथर्डी फाटा, बुरकुले हॉल जवळील उत्तम नगर, हिरे शाळेजवळ सावता नगर व सातपूरमधील महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनी या प्रतिबंधित क्षेत्रात मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी वैद्यकीय पथकाबरोबर जाऊन पाहणी केली. तसेच त्याठिकाणी असणारे पोलीस अधिकारी, मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका, विभागीय अधिकारी यांना विविध प्रकारच्या कामाच्या सूचना यावेळी दिल्या.
या भागात कार्यरत असणारे आरोग्य वैद्यकीय विभागाचे कर्मचारी यांची भोजन व्यवस्था, औषधांचा पुरवठा, पथकाद्वारे वैद्यकीय तपासणी करणे आदींच्या नियोजनाबाबतची माहिती घेतली. जो परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे, त्या परिसरातील रहिवाशांना निश्चित केलेल्या कालावधीत कुणाला येथून बाहेर जाता येणार नाही. अथवा बाहेरून याठिकाणी येता येणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. या रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूंची निकड भासू नये यादृष्टीने भाजीपाला, दूध यासारख्या वस्तू त्याच ठिकाणी उपलब्ध होतील. या दृष्टीने समन्वय करून व्यवस्था करण्याबाबत सूचित करण्यात आले.
या चारही प्रतिबंधित क्षेत्रात औषध फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच घरोघरी जाऊन परिसरातील नागरिकांची तपासणी करण्यात यावी, प्रतिबंधित क्षेत्रात ज्या ठिकाणी उत्तम जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी बाह्यरुग्ण तपासणी सुरू करण्याची व्यवस्था करावी. शासनाच्या सूचनेप्रमाणे रुग्णांवर उपचार करावेत अशा विविध सूचना आयुक्त गमे यांनी यावेळी दिल्या.
नाशकात सामाजिक प्रादुर्भाव नाही, शहरात बाहेरुन येणाऱ्या रुग्णांमुळे प्रादुर्भाव वाढत असून याबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच, बाहेरून येणाऱ्या नागरिकांना थोपविणे ही काळाची गरज आहे. बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांचा अटकाव केल्यास शहरात प्रादुर्भाव होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचा दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच मालेगावमध्ये पोलीस कर्मचारी अथवा शासकीय कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील जे कोरोना संशयित झाले असून त्यांना महापालिकेच्या माध्यमातून मदत केली जात आहे. त्यांना डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये दाखल करून घेतले जात असून त्यांच्यावर उपचार केले जात असल्याची माहिती आयुक्त गमे यांनी दिली.