नाशिक - शासकीय कोरोना टेस्टिंग लॅबपेक्षा खासगी लॅबमध्ये कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांचे आकडे जादा दाखवल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत दातार जनेटिक्स लॅबला पुढील आदेश येइपर्यंत स्वॅब टेस्टिंग करण्यास बंदी घातली आहे.
छगन भुजबळ यांनी तपासणीचे दिले होते आदेश -
नाशिक शहर व जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णाचा आकडा वाढला आहे. शासकीय लॅबपेक्षा खासगी लॅबमध्ये पाॅझिटीव्ह रुग्णांचे आकडे जादा असल्याचे समोर येत होते. या प्रकरणाची तपासणी करण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले होते. त्यानूसार दातार जनेटिक्स लॅबमधील स्वॅब टेस्टिंग केलेल्या रुग्णांची जिल्हा रुग्णालयाकडे फेरतपासणी केली असता 16 पैकी 7 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. दातार जनेटिक्स लॅब या प्रकरणात दोषी आढळल्याने पुढील आदेश येईपर्यंत या ठिकाणी कोरोना स्वॅब टेस्टिंगवर बंदी घालण्यात आली आहे.
लॅब कायमस्वरूपी का बंद करण्यात येऊ नये -
विसंगत व चुकीच्या अहवालामुळे रुग्णांचे आरोग्य व कोरोना विषयक उपाय योजनांवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत दातार लॅबमध्ये कोरोना चाचणी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. दातार लॅबने आयसीएमआरकडून उपलब्ध यंत्र सामग्रीची प्रमाणीकरण करून घ्यावे व त्याचा अहवाल सादर करावा. ही लॅब कायमस्वरुपी बंद का करण्यात येऊ नये, याबाबत दातार लॅबने जिल्हाप्रशासनाकडे खुलासा करावा. सुप्रीम डायग्नोस्टिक लॅबचे पाॅझिटीव्ह दर जादा असून जिल्हा शल्य चिकित्सक व महापालिका आरोग्य अधिकार्यांनी फेरतपासणी अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.
फेरतपासणीमधील निष्कर्ष -
- शासकीय लॅबमध्ये पाॅझिटीव्ह रेट ७.८% टक्के असताना दातार व थायरोकेअर लॅबमध्ये पाॅझिटिव्ह रेट २०% पेक्षा जादा
- सुप्रीम डायग्नोस्टिकमध्ये पाॅझिटीव्ह रेट १८.७%
- सर्वाधिक चाचण्या दातार लॅबमध्ये करण्यात अाल्या असून पाॅझिटीव्ह रेट सर्वाधिक
- स्वॅब तपासणी आयसीएमआर मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे झाली नाही
हेही वाचा - काय म्हणतोय राज्यातील कोरोना? पाहा दिवसभरातील कोरोनासंदर्भातील घडामोडी