नाशिक- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालेगाव येथे स्थानिकस्तरावर इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरता सर्व संबंधित अधिकाऱ्यांना घटना व्यवस्थापक घोषित करून त्यांना आपत्तीव्यवस्थापन कायद्याचे सर्व अधिकार प्रदान करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सगितले आहे.
अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेले अधिकार आणि जबाबदाऱ्या
लक्ष्मण राऊत,अपर जिल्हाधिकारी
शासनाच्या विविध विभागांकडून प्राप्त झालेले शासन निर्णय, परिपत्रके अन्य निर्देश तातडीने क्षेत्रीयस्तरावरील यंत्रणेकडे पाठविण्याची दक्षता घ्यावी, तसेच संबंधित यंत्रणेला दिलेले निर्देश मिळाल्याची खातरजमा करून त्याप्रमाणे प्रत्यक्ष कार्यवाही सुरु असल्याची खात्री करावी. शासनाच्या विभागांकडून निर्गमित केलेल्या धोरणात्मक निर्णयासंदर्भात क्षेत्रीयस्तरावर संबंधित विभागामार्फत अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबी स्थानिकस्तरावर उपलब्ध होत असल्याची दक्षता घेण्यात यावी. शासनाने घेतलेल्या निर्णयासंदर्भात तसेच मुख्यालयाकडून देण्यात आलेल्या सर्व निर्देशांवर दिलेल्या मुदतीत कार्यवाही पूर्ण करून पुर्तता अहवाल विहित नमुन्यामध्ये दररोज सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत संकलित करण्यात यावा. कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्राप्त होणारे प्रस्ताव, शंका आदी बाबत मार्गदर्शनपर कार्यवाही करून समन्वय राखण्यात यावे. वरील प्रमाणे कार्यवाही संदर्भात योग्य नियोजन करणे, पूर्ततेबाबत वारंवार आढावा घेणे, तसेच मुदतीत पूर्तता करून त्याबाबतचा पूर्तता अहवाल मुख्यालयातील आपत्कालीन कार्य केंद्राकडे (EOC) वेळेत सादर करण्याची संपूर्ण जबाबदारी लक्ष्मण राऊत अपर जिल्हाधिकारी यांची राहणार आहे.
संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक
लॉक डाऊनचे 100% अनुपालन होईल याबाबत संपूर्ण व्यवस्था करणे. कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर कॉन्टॅक्ट रेसिंग करताना आवश्यक ती सर्व मदत संबंधित घटना व्यवस्थापक यांना उपलब्ध करून देणे. लॉकडाऊनच्या कालावधीत कोणीही व्यक्ती बाधित क्षेत्रांमधून बाहेर येणार नाही अथवा आत जाणार नाही याची व्यवस्था ठेवणे, तसेच अपरिहार्य परिस्थितीत येणाऱ्या, जाणाऱ्या व्यक्तींबाबत नोंदी ठेवण्यात याव्यात. कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात महत्वाच्या बाबींबाबत जिल्हादंडाधिकारी व अन्य वरिष्ठ अधिकारी यांना तातडीने अवगत करण्याची जबाबदारी संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक यांची राहील.
विजयानंद शर्मा,उपविभागीय अधिकारी, मालेगाव
आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच दंडाधिकारी पदाचे अधिकार वापरून यारोगाच्या नियंत्रणासाठी आवश्यक साधनसामुग्री अधिग्रहित करणे, कायद्याचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याविरुध्द दंडाधिकारीय कारवाई करणे. स्वंयसेवी संस्था व नागरिकांकडून जास्तीत जास्त मदत प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करून त्याबाबतच्या नोंदी ठेवण्यात याव्यात. मदतीची अत्यावश्यक गरज लक्षात घेवून त्यानुसार कार्यवाही करणे. पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून कायदा व सूव्यवस्था सुरळीत राहील याची संपूर्ण जबाबदारी पार पाडणे.
सुरेश थोरात, धान्य वितरण अधिकारी मालेगाव
आपत्कालीन परिस्थितीमध्ये अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा नियमित स्वरूपात पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विविध सर्व उपाययोजना करणे. शासनाच्या विविध योजनांमार्फत प्राप्त होणारे सर्व धान्य दुकानांमध्ये गर्दी न होता वितरित केले जाईल, अशा प्रकाराची व्यवस्था करून त्यासाठी आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित करण्यात यावी. तसेच सर्व दुकानदार नियमांची योग्य अंमलबजावणी करत आहेत याकडे लक्ष ठेवणे.
नितीन कापडणीस,उपायुक्त,मालेगाव महानगरपालिका मालेगाव
संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन करणे, महानगरपालिका क्षेत्रामधील भाजीबाजार आणि जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होणार नाही, तसेच नागरीक बाहेर पडणार नाहीत, याप्रकारची व्यवस्था तयार करणे. मालेगाव महानगरपालिका क्षेत्रामध्ये संभाव्य बाधित रूग्णासाठी पुरेशी अलगीकरण व्यवस्था करण्यासाठी आवश्यक त्या इमारतींचे अधिग्रहण करून, त्या ठिकाणी महानगरपालिकेची साधन सामुग्री तसेच आवश्यकता भासल्यास खाजगी सामुग्री अथवा खाजगी व्यक्तींच्या सेवा अधिग्रहित करून या संदर्भातील शासन आदेशात नमुद सर्व बाबींची पुर्तता करणे. करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्यास त्या रूग्णांची संबंधित ‘हाय रिक्स’ व ‘लो रिक्स’ कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याकरिता संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुरेसे मनुष्यबळ पुरवणे, तसेच महानगरपालिकेकडील माहिती पुरवण्याची जबाबदारी पार पाडण्यात यावी.
जितेंद्र देवरे,गट विकास अधिकारी, मालेगाव
सर्व ग्रामीण क्षेत्रामध्ये संभाव्य बाधित रूग्णासाठी पुरेशी अलगीकरण व्यवस्था करून आवश्यकतेनुसार इमारतीचे अधिग्रहण करून त्या ठिकाणी आपले अधिनस्त साधनसामुग्री तसेच आवश्यकता भासल्यास खाजगी सामुग्री अथवा खाजगी व्यक्तींच्या सेवा अधिग्रहित करुन या संदर्भात शासन आदेशात नमूद सर्व बाबींच्या पुर्तता करणे. करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्यास त्या रूग्णाची संबंधित ‘हाय-रिक्स’ व ‘लो-रिक्स’ कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याकरिता संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुरेसे मनुष्यबळ पुरवणे तसेच अपल्याकडील माहिती पुरविणे.
चंद्रजित राजपूत, तहसिलदार मालेगाव
लॉकडाऊनच्या कालावधीत ज्यांच्याकडे भोजन तयार करण्याचे साहित्य नाही त्यांच्यासाठी राज्यस्तरावरून मिळणाऱ्या ‘रेडी टू कुक फुड पॅकेट’ ची व्यवस्था करून याबाबत राज्यस्तरीय संपर्क अधिकारी यांच्या संपर्कात रहावे. ज्यांच्याकडे स्वयंपाकाचे साहित्य आहे त्यांच्यासाठी धान्य पुरविण्याची व्यवस्था राज्य, जिल्हा अथवा स्थानिक स्तरावरील स्त्रोतांमधून करावी. त्याधसोबतच स्वंयसेवी संस्थांशी समन्वय साधून व्यवस्था करावी. ज्यांच्याकडे सर्व साधने उपलब्ध आहेत, परंतु अन्नधान्य उपलब्ध नाही, याबाबत स्थानिक पातळीवर संबंधित आस्थापनांशी योग्य समन्वय करून व्यवस्था करण्यात यावी.
डॉ. सपना ठाकरे ,वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका व डॉ. किशोर डांगे,वैद्यकीय अधिकारी, सामान्य रुग्णालय, मालेगाव
विलगीकरण कक्षाची संपुर्ण जबाबदारी पार पाडणे. सर्व संशयीत रुग्णांचे नमुने घेणे, अहवालासाठी पाठविणे व अहवाल प्राप्त करून घेण्यात यावेत. पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यास शिघ्र कृती पथकामार्फत हाय रिस्क् व लो रिस्क यादी संबंधित स्थानिक प्राधिकरणाच्या मदतीने बनवून व त्यासंबंधीची सर्व जबाबदारी पार पाडण्यात यावी. उपचाराकरिता आवश्यक असलेल्या विविध साधन व साहित्याचे नियोजन करून ते उपलब्ध करून घेण्यात यावे. सेवानिवृत्त तज्ञ व अन्य तांत्रिक वैद्यकीय सेवा संलग्न अधिकारी, कर्मचारी यांची सेवा उपलब्ध घेण्यात याव्यात. आवश्यकतेप्रमाणे स्वयंसेवी संस्थाचे वैद्यकीय व्यावसायिक यांच्या सेवा घेणे, तसेच अपरिहार्य परिस्थितीमध्ये वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहीत कराव्यात.
आपतकालीन ऑपरेशन सेंटरमध्ये नियुक्त केलेल्या सर्व संबंधित अधिकारी यांनी सोपविलेल्या जबाबदारीचा दैनंदिन अहवाल दररोज सायंकाळी 5 वाजेपर्यंत लक्ष्मण राऊत, घटना व्यवस्थापक तथा अपर जिल्हाधिकारी, मालेगाव यांच्याकडे सादर करावा. राऊत यांनी एकत्रित अहवाल वासंती माळी, उपजिल्हाधिकारी, आपत्कालीन कार्य केंद्र (EOC) चे प्रभारी अधिकारी, जिल्हा आपत्ती कक्ष यांच्याकडे तातडीने पाठवावा, असे आदेश देण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांना सोपवलेली कामे प्रभावीपणे पुर्ण करण्याकरिता वरील सर्वाना आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 मधील तरतूदीनुसार प्राप्त झालेल्या अधिकारानुसार पुर्वतयारी व प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी ‘घटना व्यवस्थापक’ (INCIDENT MANAGER) म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्या कायद्यातील सर्व अधिकारांचा वापर करण्यास प्राधिकृत करण्यात येत असल्याचेही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी निर्देशित केले आहे.